अपडेट्स

वेबसाईटवर नवनवीन माहिती अपडेट होत आहे....

Saturday, May 16, 2020

एक आगळावेगळा नवोपक्रम | बायोगॅस इंधन निर्मिती प्रकल्प

एक आगळावेगळा नवोपक्रम - बायोगॅस इंधन निर्मिती 

इनामदार चांदभाई  (उपाध्यापक)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मूगाव ता. दौंड जि.पुणे         

  प्रस्तावना - यांत्रिक युगात मानवापुढे इंधन ही सर्वात मोठी समस्या आहे. अश्मयुगापासून मानव अग्निचा वापर करू लागला.आपण इंधनासाठी लाकडाचा वापर मोठ्याप्रमाणात करतो. त्यासाठी जंगलतोड करतो. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला असून दुष्काळ,अतिवृष्टी,तापमान वाढ आशा समस्या मानवापुढे निर्माण झाल्या आहेत. या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला पवनऊर्जा,जलविदयुत ऊर्जा,सौरऊर्जा व बायोगॅस या अपारंपरिक ऊर्जास्रोताचा जास्तीत जास्त वापर करणे आवश्यक आहे. 

तुम्हाला कल्पना नसेल की वर्षभर आपल्याला जेवढी उर्जा लागते, तेवढी उर्जा सूर्य केवळ ४० मिनिटात आपल्याला देतो- तेही फुकट! कोणतेही मीटर न लावता!
फक्त ती उर्जा कशी घ्यायची आणि कशी वापरायची हाच महत्वाचा मुद्दा आहे.उर्जेची ही समस्या सोडवण्यासाठी आपणही खारीचा वाटा उचलावा असे आम्हांला वाटले व त्यातूनच जि.प.प्राथ.शाळा मूगाव ता.दौंड जि.पुणे या शाळेने एक नवोपक्रम जन्माला घातला त्याचे नाव ‘एक आगळावेगळा नवोपक्रम – बायोगॅस.

 नवोपक्रमाची माझी गरज –

     मध्यान्ह  भोजन शिजविण्यासाठी लागणारे इंधन ही मोठी समस्या होती.कधी कधी गॅस वेळेत मिळत नसे . शिक्षकाला अध्यापन सोडून गॅस आणण्यासाठी जावे लागत त्याचा परिणाम अध्यापनावर होत असे. शिल्लक भात व खरकटे याची दुर्गंधी शाळेच्या परिसरात पसरत असे.तसेच खरकटे मुलांच्या पायाला चिकटून वर्गात व इतरत्र पसरत असे.
      यावर उपाय म्हणून काय तर आम्ही सर्व शिक्षक ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी एकत्र येऊन चर्चासत्र आयोजित केले.आमच्या शाळेचे शौचालय व ग्रामपंचायत सार्वजनिक शौचालय यातून बाहेर पडणारे मलमूत्र एकत्रितपणे  बायोगॅसला जोडले तर आपल्याला शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी इंधन उपलब्ध होईल व शौचालय परिसरातील दुर्गंधीला आळा बसेल. असा विचार चर्चेतून पुढे आला.त्यासाठी ग्रामपंचायतीचे सहकार्य घेण्याचे ठरले.तसा नियोजनाचा आराखडा तयार करण्यात आला.

नवोपक्रमाची माझी उद्दिष्टे –

 १) शौचालयातील मलमूत्राचे योग्य व्यवस्थापन करणे.
२) शिल्लक भात व खरकटे याची योग्य विल्हेवाट लावणे.
३) दुर्गंधी व रोगराईला आळा घालणे.
४) विद्यार्थ्याना बायोगॅस सयंत्राची माहिती करून देणे.
५) पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल हे समजावणे.
६) इंधनासाठी लागणाऱ्या  पैशांचा  वापर विद्यार्थ्याच्या पुरक आहारासाठी करणे.
७) एल.पी.जी. गॅस आणणेसाठी जाणाऱ्या शिक्षकाचा वेळ वाचवणे.
८) सांडपाणी व्यवस्थापन,कचरा व्यवस्थापन याविषयी माहिती देणे.
९) अपारंपरिक उर्जाचा वापर समजावणे.

नवोपक्रमाचे नियोजन –

  प्रस्तुत उपक्रम हा जि.प.प्राथ.शाळा मूगाव ता.दौंड जि.पुणे या शाळेसाठी मर्यादित ठेवण्यात आला. बायोगॅस प्रकल्पासाठी शासनाची आर्थिक मदत मिळते याची माहिती मिळवली. बायोगॅस सयंत्र बांधकाम करणाऱ्या व्यक्तीकडून बांधकाम खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला.ग्रामपंचायत हिंगणीबेर्डी कडून आर्थिक तरतूद मंजूर करणेत आली.काही आर्थिक तरतूद जि.प.प्रा.शाळा मूगाव कडून करण्याचे  ठरले.त्यासाठी लागणारे शेण पालकांकडून गोळा करण्याचे ठरले.
नवोपक्रमाची प्रत्यक्ष कार्यवाही –
  सर्वप्रथम बायोगॅस सयंत्र निर्मिती बांधकाम करणाऱ्या व्यक्तीकडून बायोगॅसची टाकी बांधण्यात आली.खरकटे टाकण्यासाठी एक इनलेट हौद बांधण्यात आला.दुसऱ्या बाजूने आउट लेट काढून ते शोषखड्यात सोडण्यात आले.नंतर शालेय शौचालय व ग्रामपंचायत शौचालय यांचे मलमूत्र एका पाईपने एकत्रितपणे बायोगॅस सयंत्रला स्वतः श्री.इनामदार सर ,श्री.कातोरे सर ,श्री.शेळके सर या शिक्षकांनी जोडणी केली.त्यानंतर सर्व  विद्यार्थ्याना २ -३ दिवस शेण आपल्या घरी साठवून ठेवण्यास सांगितले..शा.व्य.समिती अध्यक्ष श्री.दत्ता खोमणे व शिक्षकांनी एक ट्रोलीच्या मदतीने घरोघरी जाऊन शेण गोळा केले.ते शेण मजुरांकडून बायोगॅसमध्ये सोडले.आठ दिवसांनंतर बायोगॅसला नळी जोडून किचनशेडमधील शेगडीला तिची जोडणी करण्यात आली. बायोगॅस सुरळीत चालण्यासाठी त्यात मध्यान्ह भोजनातील मुलांच्या ताटातील खरकटे व तसेच शिल्लक भात-भाजी एका टबमध्ये जमा करून
शालेय पोषण आहार मदतनीसच्या मदतीने बायोगॅसमध्ये सोडण्यात येते.त्यामुळे गेले दोन वर्षापासून आमचा बायोगॅस सुरळीत सुरु आहे.

उपक्रमाची यशस्वीता-

ठरविलेल्या उद्दिष्टांनुसार कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे खालील फायदे झाले.
१) शौचालयातील मलमूत्राचे योग्य व्यवस्थापन झाले.
२) शिल्लक भात व खरकटे याची योग्य विल्हेवाट लागली.
३) दुर्गंधी व रोगराईला आळा बसला.
४) विद्यार्थ्याना बायोगॅस सयंत्राची माहिती प्राप्त झाली.
५) पर्यावरणाचा समतोल राखला गेला.
६) इंधनासाठी लागणाऱ्या  पैशांचा  वापर विद्यार्थ्याच्या पुरक आहार व भाजीपाल्यासाठी करण्यात येऊ लागला.
७) एल.पी.जी. गॅस आणणेसाठी जाणाऱ्या शिक्षकाचा वेळ वाचला.
८) सांडपाणी व्यवस्थापन,कचरा व्यवस्थापन याची माहिती मुलांना झाली.
९) अपारंपरिक उर्जाचा वापर कसा करावा ते समजले.
१०) गॅसचा स्फोट व अपघात याची भीती राहिली नाही.
११) इतर शाळेना एक आदर्श उपक्रम ठरला.
१२) पूर्वी १८ ते २० दिवसाला गॅस आणावा लागत होता आता तीन महिन्यातून एकदा  गॅस आणावा लागतो.

नवोपक्रमासाठी आलेला खर्च -
१) ग्रामपंचायत हिंगणीबेर्डी यांचेकडून १०००० रुपये.
२) जि.प.प्राथ.शाळा मूगाव यांचेकडून ५००० रुपये.
                         एकूण खर्च – १५००० रुपये.

उपक्रमासाठी सहकार्य व मार्गदर्शन-

ग्रामपंचायत हिंगणीबेर्डी
शालेय व्यवस्थापन समिती मूगाव
जि.प.प्राथ.शाळा मूगाव सर्व शिक्षकवृंद
सर्व पालक व विद्यार्थी मूगाव
गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्ताराधिकारी व केंद्रप्रमुख

No comments:

Post a Comment

Popular